Monday, May 24, 2021

जेम्स लेनचा नवा सल्लागार - गिरीश कुबेर?

जेम्स लेनचा नवा सल्लागार - गिरीश कुबेर?

गिरीश कुबेर यांच्या "अन्यथा" या सदराचा मी अगदी सुरुवातीपासून चाहता होतो.

त्याला पहिला तडा गेला त्यांच्या "बळीराजाची बोगस बोंब" या लेखानंतर आणि आता त्यांच्या नव्या पुस्तकात त्यांनी उधळलेली मुक्ताफळे निदर्शनास आल्यावर मात्र या बुद्धिभेदास उघडं पाडणं गरजेचंच बनतं.

सर्वप्रथम त्यांनी शंभूराजे, महाराणी सोयराबाई यांच्यावर ओकलेली गरळ आणि अष्टप्रधान मंडळातील कारस्थानी मंत्र्यांची (हळुवारपणे) केलेली वकिली हे विस्तृतपणे समजून घेऊ (माझ्या वाचनात संपूर्ण पुस्तक आलेले नाही, परंतु त्यातला जितका मजकूर वाचनात आलाय तो त्यांच्या मनातली मळमळ समजून घेण्यास पुरेसा आहे)

ते लिहितात

संभाजींनी या वारस वादाचा शेवट सोयराबाईंचा आणि त्यांच्याशी प्रामाणिक असणाऱ्या शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील काहींचा खून करून केला

हे रक्तरंजित पर्व शिवाजींनी गुणवान लोकांचा बनविलेला अमूल्य समूह घेऊन गेले आणि याची संभाजीना खूप मोठी किंमत मोजावी लागली तसेच जरी संभाजी धाडसी असले तरी आपल्या पित्याप्रमाणे संयंमी व मुत्सद्दी नव्हते.

आता हे सगळं वाचल्यावर कोणत्याही नवख्या माणसाच्या मनात सर्वप्रथम कोणत्या भावना उमटतील?

शिवरायांच्या मंत्र्यांपैकी काहीजण सोयराबाईंशी प्रामाणिक होते त्यांना व आपली सावत्र माता सोयराबाईंना संभाजी महाराजांनी ठार मारले

शिवरायांनी बनविलेली "प्रतिभासंपन्न" लोकांच्या जंत्रीस स्वराज्य मुकले ज्यामुळे पर्यायाने स्वराज्याला आणि संभाजीराजांना खूप मोठी किंमत मोजावी लागली (इथं ते एकाच वाक्यात हळुवारपणे कारस्थानी मंत्र्यांना "अमूल्य" असं संबोधतात आणि नकळत क्लीन चिट देत संभाजीराजांना मात्र बेमालूमपणे चुकीचं ठरवतात)

आता या धादांत खोटारडेपणाचा थोडक्यात समाचार घेऊ

गिरीश कुबेर ज्यांना "टॅलेंट पूल" (गुणवान लोकं) वगैरे म्हणतात त्या "प्रतिभावान" सरकारकूनांपैकी काहींनी आपली "प्रतिभा" कशी पाजळली याचा संक्षिप्त आढावा घेऊ

शिवराय साधारणपणे १२ दिवस (२० मार्च ते ३ एप्रिल) आजारी असताना त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजांस न कळविल्याने त्यांना शिवरायांच्या आजारपणात त्यांच्या दिमतीस येता आलं नाही

शिवरायांसारख्या "प्रचंड लोकप्रिय" अशा रयतेच्या राजाच्या निधनाची बातमी लोकांपासूनच काय तर खुद्द संभाजीराजांपासून लपवून रायगडाची दारे बंद करून शिवरायांच्या चितेस अग्नीही मिळायच्या आधी संभाजीराजांविरुद्ध खलबतं करत सोयराबाईंवर शिवरायांच्या मृत्यूसंदर्भात संशयाच्या कंड्याही पिकविल्या ज्याच्या जोरावर सोयराबाईंना भिववून व दडपण आणून त्यांचा आपल्या अभद्र योजनेसाठी पाहिजे तसा वापर करून घेतला (याचा दुसरा अर्थ असाही आहे की ही विषारी योजना महाराणी सोयराबाईंची कधीच नव्हती)

आपले वडील कसे आहेत याची विचारणा करताच शिवराय बरे असल्याची खोटी ग्वाहीही संभाजीराजांना देण्यात आली आणि जवळपास १० ते १५ दिवस शिवरायांच्या मृत्यूची बातमीही त्यांना कळू दिली नाही (कारण त्यांना ठरवलेली योजना रायगडावर पार पडायची होती)

अनाजी दत्तोने सोयराबाईंबरोबर बाळाजी आवजी व मोरोपंतांसारख्या इतर मंत्र्यांवरही दबाव टाकून या कुटील डावात सहभागी व्हायला लावले

बरं सभासदही अगदी स्पष्टपणे लिहितो की राज्य वाटण्याची कल्पना ही कारकुनांची (सोयराबाईंची नव्हे)

संभाजीराजांविरुद्ध सैनिक जायला तयार नसल्याने या मंत्र्यांनी अनेकांना दुप्पट वेतन दिले होते

"अर्थतज्ञ्" गिरीश कुबेर ज्यांचा उल्लेख "गुणवान" असा करतात त्यांचा उल्लेख "इतिहासकार" वा. सी. बेंद्रे मात्र कुमंत्री, दुर्मंत्री, शेतकऱ्यांना अति वाईट संकटात टाकणारे, लाचेसाठी हपापलेले असा करतात !

रयतेला, गरीब शेतकऱ्यांना सूट दिली म्हणून संभाजीराजांची तक्रार करणाऱ्या अण्णाजी दत्तोने सप्टेंबर १६७९ मध्ये राजापूरला धोपेश्वराच्या दर्शनाला येऊन मात्र २०००० ब्राह्मणांना जेऊ घातले या प्रसंगाची तुलना कुबेरांच्या "बळीराजाची बोगस बोंब" या लेखामागील मानसुब्याशी करता येईल !

आणि कुबेरांच्या या सर्व "गुणवान" लोकांचा हा विषारी कारभार कधी चालला होता? - दिल्लीचे आक्रमण स्वराज्यावर घोंघावत असताना !

"मराठी साम्राज्याची छोटी बखर" मध्ये उल्लेखिल्याप्रमाणे "ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत कोणीही स्वार्थी कारकुनांच्या हवाली व्हायला तयार नव्हते" तसेच सोयराबाईंच्या आत्महत्येचाही उल्लेख आढळतो तसेच काही स्वार्थी सरकारकूनांव्यतिरिक्त इतर कारकून, लष्कर, सुभेदार, सेनापतींना संभाजी राजा शहाणा व न्यायी वाटत होता आणि हेच पुढे सिद्धही झालं

स्वराज्याच्या आणि त्यांच्या जीवाशी खेळणारी इतकी कारस्थानं करूनही संभाजीराजांनी मंत्र्यांना शिक्षा ठोठावली नव्हती

त्यांना शिक्षा देण्यात आली ती त्यांचा शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य औरंगजेबाचा पुत्र अकबरास देण्याचा  दुसरा कट उघडकीस आल्यानंतर !

इथं तत्कालीन पत्रव्यवहार व प्रवासी लेखकांनी केलेल्या नोंदीही अत्यंत महत्वपूर्ण ठरतात

राजापूरकर इंग्रज वखारवाल्यांच्या बातम्या आणि नोंदींमध्ये नमूद असल्याप्रमाणे शंभूराजांनी १८ जून १६८० ला रायगडावर आल्यानंतर आपल्या धाकट्या भावास (राजाराम महाराज) अत्यंत ममतेने वागविले व वागवत आहे

इतकंच नव्हे तर शिवरायांना संभाजीवर कारभाऱ्यांकडून विषप्रयोग किंवा घातपात होण्याची शक्यता वाटत असल्यानेच दक्षिणेच्या मोहिमेवर निघताना शंभुराजांना रायगडापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ते करत होते असा संशय एक डच वखारकर व्यक्त करतो म्हणजेच शिवरायांच्या हयातीतच या कारस्थानाचा सुगावा त्यांना लागला होता हे नक्की.

ज्या शंभूराजेंना "अर्थशास्त्री" कुबेरजी अप्रत्यक्षपणे "उतावीळ व कमी मुत्सद्दी" संबोधतात त्याच संभाजीराजांचे वर्णन तत्कालीन इंग्रज "संभाजीराजा अत्यंत धूर्त व शहाणा आहे (Report speaks him very diligent and careful) तसेच त्याचा कारभार शिवरायांपेक्षा अधिक सुसंस्कृत, दयाळू व नेमस्त असा आहे" असा करतात 

परमानंदही लिहितो की संभाजीराजांनी सोयराबाई व दुसऱ्या ३ मातांचे रायगडावर येताच सांत्वन केले

उग्र प्रकृती संभाजी असे नामकरण  असणार्या मराठी रियासत खंड दोन मधे गो. स. सरदेसाई लिहितात, "राज्याच्या मुख्य घडामोडी संभाजीने आपल्या अष्टप्रधानां च्या विद्यमानच सिद्धीस नेल्या" (पृ.क्र.३६)

ज्या शंभुराजांना कुबेर चपलखपणे "उतावीळ व कमी मुत्सद्दी" म्हणतात त्या शिवपुत्र संभाजीची लढाई "एकाचवेळी" कोणाकोणाबरोबर होती?

५ लाखांवर फौज घेऊन "खासा" दक्षिणेत उतरलेल्या सम्राट औरंगजेबाशी, गोव्यातल्या पोर्तुगीजांशी, स्वराज्याच्या आणि त्यांच्या जीवावर उठलेल्या स्वार्थांध कारकूनांशी तसेच पत्नी येसूबाईंना राज्यकारभाराचे अधिकार देऊन ते एकप्रकारे जातिव्यवस्थेवर प्रहार करून शाक्त धर्मप्रसाराचे महायुध्दही लढत होते !

स्वराज्य निर्माण करताना त्यागी लोक भेटतात पण ते निर्माण झाल्यावर त्याच स्वराज्याकडे मतलबाने पाहणारे लोकही निर्माण होतात, अशा मतलबी स्वकियांशी त्यांची लढाई होती !

नेमके हे सगळे संदर्भ सोडून "अर्थशास्त्री" कुबेरजींना मल्हार रामरावासारख्या समकालीन नसणाऱ्या किंवा १८ व्या शतकातील बखरकारांचे भरमसाठ दंतकथांनी भरलेले लिखाण कसे बरे सापडले?

"अर्थशास्त्री" कुबेरांचे ट्रानफॉर्मेशन "इतिहासकार" म्हणून होत असताना हा निव्वळ योगायोग कसा मानावा? 

गिरीश कुबेरांना त्यांनी ओकलेली गरळ किंवा लिखाण हे धादांत खोटं आहे हे माहित नसणे ही अशक्यकोटीतली गोष्ट आहे त्यामुळे यामध्ये पुन्हा काही कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ या ग्रंथातील नरहर कुरुंदकरांच्या लेखात   छत्रपती संभाजी बद्दल त्यांनी व्यक्त केलेले मत असे आहे की ज्याने लक्षावधी च्या फौजेच्या चौफेर आक्रमणाला प्रजेचे नुकसान होऊ न देता खंबीरपणे तोंड दिले व औरंगजेबाला निराश केले तो माणूस लहरी उतावळा विलासी रागीट कसा असेल अशी शंका इतिहासकारांना का आली नाही हे नरहर कुरुंदकर यांचे मत कुबेरां च्या वाचनात आलेलेच नसावे असे आम्ही कसे म्हणावे?

कुबेर बेधडकपणे संभाजीराजांबद्दल इतकी गरळ ओकत असतील तर थोरल्या शाहू महाराजांच्या दूरदृष्टीबद्दल किंवा राजर्षी शाहूंच्या प्रचंड क्रांतिकारी आणि महान सामाजिक योगदानाबद्दल लिहितील ही मुळात अपेक्षाच करणं भाबडेपणाचं ठरेल

संभाजीराजांना बदनाम करण्याची मोहीम अनाजी दत्तोंपासून गेली सतत ३०० वर्षे अखंड कार्यरत आहे, काही दंतकथाकारांनंतर त्यात महत्वाची भूमिका बजावली ती नाटककारांनी आणि त्यात आता भर पडली "अर्थशास्त्री" कुबेरांची !

संभाजीराजांच्या बदनामीचा कट हा सांस्कृतिक कलुषित वृत्तीचा व इतिहासाच्या विकृतीकरणाच्या प्रवृत्तीचा एक भाग आहे ज्याचे गौतम बुद्ध, महात्मा फुले, संभाजी महाराज ते महात्मा गांधी हे सर्वजणही त्याच विकृतीकरणाच्या वृत्तीचे शिकार आहेत आणि कुबेरांसारखे अनेकजण त्याचे शिकारी आहेत.

आता ही शिकार करताना कुबेरांच्या "कुबेरीत" किती भर पडली याचा शोध घ्यावा लागेल !

तरीही आम्हाला हे मनापासून सांगावंसं वाटतं की "अर्थतज्ञ्" कुबेरांनी पेशवाईकालात लिहिल्या गेलेल्या बखरींवर विसंबून न राहता स्वतंत्रपणाने चिकित्सक अभ्यास करणाऱ्या वा सी बेंद्रे, डॉ जयसिंगराव पवार, शेजवलकर, डॉ आनंद पाटील, कॉ शरद पाटील यांच्या चिकित्सक ऐतिहासिक लेखनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना नक्कीच (त्यांच्या दृष्टीने) विद्वान, मुत्सद्दी, मातृवत्सल, चारित्र्यसंपन्न, महापराक्रमी शिवपुत्र संभाजीचा शोध लागल्याशिवाय राहणार नाही !

"विद्वान, मुत्सद्दी, मातृवत्सल, चारित्र्यसंपन्न, महापराक्रमी शिवपुत्र - छत्रपती संभाजी महाराज" यांना बदनाम करणाऱ्या या कुत्सित लिखाणाबद्दल गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध.

महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाने या खोट्या पुस्तकावर तात्काळ बंदी घालून गिरीश कुबेर यांची चौकशी करावी ही विनंती !


संदर्भ :

१) छत्रपती संभाजी महाराज - वा सी बेंद्रे

२) छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ - डॉ जयसिंगराव पवार

३) मराठी रियासत खंड २ - ग गो सरदेसाई

४) शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण : महंमदी की ब्राह्मण? - कॉ शरद पाटील

 

No comments:

Post a Comment