Sunday, December 8, 2019

शिवाजी विद्यापीठ - एक दर्जेदार नाव


*शिवाजी विद्यापीठ - एक दर्जेदार नाव*

खरंतर शिवाजी हे आपलं दैवत. या नावाचा संक्षिप्त उल्लेख होऊ नये... "शिवाजी" हे नावच अत्यंत दर्जेदार आणि अनादी काळापर्यंत चालावं आणि लोकांच्या तोंडात २४ तास रुळावं या उदात्त हेतूनेच संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण आणि विद्यापीठ स्थापना व नामकरण समितीच्या सदस्यांनी ज्यामध्ये प्रा. एन.डी.पाटील, डॉ.भास्कर पाटील, बाळासाहेब देसाई, डॉ.अप्पासाहेब पवार, अनेक प्रशासकीय अधिकारी यांसारख्या लोकांनी जाणीवपूर्वक विद्यापीठाचं नाव "शिवाजी विद्यापीठ" असंच ठेवण्याचा निर्णय घेतला.

VJTI सारखं नावाजलेलं अभियांत्रिकी कॉलेज - किती जणांना माहित आहे कि याच नाव "वीरमाता जिजाबाई टेकनिकल इन्स्टिटयूट" असं आहे ते?
CST - किती परदेशी पर्यटकांना किंवा देशभरातून करिअर साठी येणाऱ्या किती युवकांना माहित आहे कि हे नाव "छत्रपती शिवाजी टर्मिनल" असं आहे ते?
SGM कॉलेज कराड या रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेज मध्ये प्राध्यापक पदासाठी मुलाखती चालू होत्या. प्रा.एन डी पाटील हे मुलाखती घेत होते. एका प्राध्यापक-उमेदवाराला त्यांनी प्रश्न विचारला "तुम्हाला SGM चा अर्थ माहित आहे काय (सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज)?" त्यावर त्याचं "नाही" असं उत्तर !!!! :(


आपल्या भगिनी हादग्यामध्ये गाणी म्हणतात - "शिवाजी अमुचा राजा, त्याचा तो तोरण किल्ला..."
आपण घोषणा देतो - "जय शिवाजी"
३५० वर्षांपासून आपल्याकडे पोवाडे गेले जातात, "त्यास नाही जाणीव शक्तीची... शिवाजी राजाच्या कारामतीची..."

या सर्वांमध्ये "शिवाजी" असा उल्लेख हा अति-आदर, भक्ती, हक्क आणि प्रेम या भावनांचा सुंदर मिलाफ असतो..!!
अगदी तसाच जो प्रबोधनकार ठाकरे यांच्या "दगलबाज शिवाजी" किंवा कॉ.गोविंद पानसरे यांच्या "शिवाजी कोण होता" या पुस्तकांमध्येही आढळतो..!!
हा उल्लेख अगदी तसाच आहे जसा आपण "भैरूबाच्या नावानं... जोतिबाच्या नावानं.... नाईकबाच्या नावानं चांगभलं किंवा उदे ग अंबे उदे ..." असं अगदी भक्तिभावानं म्हणतो..!!
मराठी भाषेमध्ये आई, देव आणि राजा यांचा उल्लेख अति-आदर आणि जिव्हाळ्यामुळेच एकेरी केला जातो.

त्यामुळे समस्त कोल्हापूरकर, शिवभक्त आणि शिवाजी विद्यापीठाचे आजी-माजी विद्यार्थी यांनी शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून "छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (जे भविष्यात CSMUK असं काहीसं होऊन जाईल)" हे न करता "शिवाजी विद्यापीठ" असंच राहू देऊन लोकभावनेचा आदर करावा यासाठी चळवळ उभी करावी आणि शासनाला नाव बदलण्याचा निर्णय घेण्यापासून परावृत्त करावे हि नम्र विनंती..!

#माझेविद्यापीठशिवाजीविद्यापीठ

4 comments: