बळीराजासाठी झटणारा सच्चा लढवय्या कोणाच्या डोळ्यात सलतोय?
सध्या एका वेगवान प्रचारानं जोर धरलाय
प्रसारमाध्यमांमधील "काही"जण विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत निष्ठेने पार पडताना दिसत आहेत..!आधीच तयार केलेले रेडी-मेड मेसेजेस फिरताना बघितले की या सगळ्याची मनापासून कीव येऊ लागते.
२०१४ च्या लोकसभेच्या आधी राजू शेट्टींना भाजप गोटात नेण्यासाठी विरोधी पक्षातील सगळ्याच दिग्गज नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यांना साकडं घालून नरेंद्र मोदींची भेट घडवून आणली.
जवळपास एक तास चाललेल्या या भेटीत राजू शेट्टींनी शेती आणि शेतकरी धोरणांचे अनेक मुद्दे मोदींकडून कबुल करून घेऊन एन.डी.ए. च्या जाहीरनाम्यात घ्यायला लावले परंतु निवडून आल्यावर जसजसे दिवस जातील तसतसे केंद्र शासनाकडूनच शेतकरी धोरणांना हरताळ फासण्याचा एककलमी कार्यक्रम चालू झाला.
शेतीविषयक धोरणांतील उदासीनता, अर्थसंकल्पातील शेतीवरील घटत्या तरतुदी आणि घटते प्राधान्य, धार्मिक द्वेष पसरवून कोणत्याही परिस्थितीत सत्ता हस्तगत करण्यासाठी पातळी सोडून चाललेलं गलिच्छ राजकारण या सगळ्याला कंटाळून राजू शेट्टींनी शेवटी एन डी ए ला रामराम ठोकला..!
२०१७ ला सत्तेत असताना एन डी ए ला रामराम ठोकणारे राजू शेट्टी हे देशातले पहिले असे शेतकरी नेते होते ज्यांनी लयाला चाललेल्या शेतकरी चळवळी आणि आंदोलनं फक्त जिवंतच ठेवली नाहीत तर देशपातळीवर शेतकऱ्यांच्या संघटनांची एकत्र मोट बांधायचं अत्यंत महत्वपूर्ण काम केलं.
यानंतरच्या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवरच घाव घालणाऱ्या केंद्र शासनविरोधात करण्यासाठीच्या संघर्षास बळ मिळावं म्हणून त्यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठीच्या प्रक्रियेत भाग घेतला आणि त्यातूनच महाविकास आघाडीचा मित्र पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर या संघर्षात उडी घेतली.
खरंतर राजू शेट्टींसारखा सच्चा लढवय्या शेतकरी नेता जर सत्ताधारी पक्षाच्या गोटात आला तर त्यांच्या विचारस्पष्टतेमुळे सत्ताधार्यांनाच त्यांचा त्रास व्हायला हवा, पण इथं होतंय उलटंच..!
सत्ताधारी सोडून, भाजप आणि त्यांच्यापेक्षा "काही" प्रसारमाध्यमांमध्येच असा काही पोटशूळ उठलाय की जणू कोणीतरी त्यांच्या ताटातली भाकरीच हिसकावून घेतली असावी..!
पूर्वी शेतकरी नेते शरद जोशींनी भाजपाची राज्यसभेची ऑफर स्वीकारलेली त्यावेळी या निर्णयाला "शेतकरी हितासाठी" म्हणणारे आता मात्र ही चळवळ भारतभर जिवंत ठेवणाऱ्या एकमेव शेतकरी नेते राजू शेट्टींना पाण्यात का बघतात हेच खरं तर न उलगडणारं कोडं आहे..!
कदाचित महाराष्ट्रभर सर्वदूर शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या राजू शेट्टींना मूळ राजकीय प्रवाहात जाऊन व्यवस्थेचा भाग होणं त्यांना बघवतही नसेल..!
एका सर्वसामान्य शेतकरी पोरानं व्यवस्थेचा भाग होऊन मूळ राजकीय प्रवाहात जाऊन शेती आणि शेतकरी विरोधी शासनाच्या विरोधात त्यांच्या पारंपरिक विरोधकांशी मिळून संघर्ष करणं, शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडून त्याला मूर्त रूप द्यायचा प्रयत्न करणं कोणाच्या डोळ्यात खुपतंय?
अशावेळी बळीराजासाठी धडपडणाऱ्या राजू शेट्टींनी ही संधी कोणत्याही परिस्थितीत दवडू नये.
"काही" प्रसारमाध्यमांनी उभा केलेल्या फसव्या धुक्याला शेतकरी राजानं बळी न पडता हे ठरवायलाच हवं की शेतकरी चळवळीच्या हितासाठीच्या संघर्षाला आकार देण्यासाठी विधानपरिषदेवर "बळीराजाचा" आवाज राजू शेट्टींच्या माध्यमातून घुमायलाच हवा..!
*शेतकऱ्यांच्या स्वप्नांना जिवंत ठेवणारा, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव लाखो शेतकऱ्यांच्या मध्ये बसून ठरवणारा, शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंना आपल्या डोळ्यातील आग बनवून आंदोलनाचा अंगार पेटवणारा राजू शेट्टी नावाचा जिगरबाज नेता व्यवस्थेत जाऊन त्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी धडपडणार असेल तर त्याचं स्वागतच, त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच..!