Friday, October 2, 2020

गांधीचोर



कॉम्रेड गोविंद पानसरेंचा त्यांच्या हत्येच्या काही दिवस आधी एका वर्तमानपत्रामध्ये एक लेख आला होता, त्यामध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं -  महात्मा गांधी झिंदाबाद, गांधीवाद मुर्दाबाद !!

आपल्या सर्वांना एका धोक्याचा इशारा देताना त्यांनी लिहिलं होतं आणि ते बोलायचेही की ज्यावेळी एखाद्याला मारून किंवा बदनामी करून त्याला किंवा त्याच्या विचारांना संपवता येत नाही त्यावेळी ही मंडळी वरवर त्याचीच पूजा करू लागतात आणि आतून बदनामीची आणि  आपल्या गलिच्छ विचारांची कुजबुज मोहीम चालूच ठेवतात !

एकीकडे बुद्धाचं आणि गांधींचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे मात्र "सातत्याने अपशब्द वापरणाऱ्या, घाणेरड्या लैंगिक टिपण्णी करणाऱ्या आणि समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यासाठी अफवा पसरवणाऱ्या जवळपास सर्वच समाजकंटकांना" ट्विटर सारख्या समाजमाध्यमांमध्ये फॉलो करायचं ही भारतासारख्या देशाच्या पंतप्रधानांची कृती कॉम्रेड पानसरेंनी सांगितलेल्या "त्याच" धोरणाची द्योतक आहे !

समाजापुढं जाताना अत्यंत नाटकी स्वरूपात गांधींचा जयघोष करायचा आणि मागून आपली "अंधारातली" कृष्णकृत्यं चालूच ठेवायची यातून काय साध्य होतं असेल बरं?

लोकशाही, मानवता, प्रेम, धर्मनिरपेक्षतेसारख्या मूल्यांवर श्रद्धा असणाऱ्या लोकांना गोंधळात टाकून, त्यांच्या टीकेची धार बोथट करून, आपल्या क्रूर आणि द्वेषपूर्ण मोहीमांतील अनेक अडथळे सहज दूर करण्याचं त्यांचं हे नवं तंत्र कॉम्रेड गोविंद पानसरेंनी आधीच ओळखलं होतं, कदाचित म्हणूनच त्यांच्या भीतीने पुन्हा "गांधी" मारायचा भेकड प्रयत्न केला असेल !

उत्तुंग गांधीविचारांची बेमालूमपणे होतं असलेली ही सहज विटंबना आपल्या लक्षात येईपर्यंत द्वेषमूलक तत्वांनी आपल्या मेंदूचा ताबा घेतलेला आपल्याला कळावा म्हणून हा लेखन प्रपंच

बाकी "मरते हम तुम है, गांधी कभी मरते नहीं" असं नुसतं बोलून आजच्या विषारी युगात चालणार नाही तर अखंड सावध राहून मानवतेच्या मारेकऱ्यांनी "चोरलेला" गांधी समजूनही घ्यावा लागेल आणि आपल्या खऱ्या गांधीला जपावंही लागेल, हृदयाच्या अगदी खोल कप्प्यात !

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏