Wednesday, December 9, 2020

सोनिया गांधी








सोनिया गांधी : भारतीय संस्कृतीचं सर्वोत्तम प्रतीक

कर्मसंयोगानं तिचं लग्न होतं, घरचे सगळे पाश सोडून ती आपल्या आयुष्यभराच्या जोडीदारासोबत त्याच्या घरी निघते, निस्सीम प्रेम या एकाच अपेक्षेसहीत ती संपूर्ण आयुष्य त्याचा गाव, त्याची माणसं, त्याची कर्तव्य, त्याचे ताण, त्याच्या आवडी-निवडी या सगळ्यांना अगदी सहजपणे आपलंस करून आयुष्यभर त्याला जीवापाड साथ देत पोटतिडकीने जपते ! ही वर्णनं म्हणजे भारतीय स्त्रिसंस्कृतीची ओघवती वैशिष्ट्येच !

पण हे सगळं करता करता एखाद्या स्त्रीच्या वाट्याला अनपेक्षित वैधव्याचं दुःख आलं तर? तिथून पुढचा आयुष्यभराचा काळ तिच्यासाठी अगणित संघर्ष आणि परीक्षांचाच असतो !

या परिस्थितही अनंतात विलीन झालेल्या आपल्या जोडीदाराच्या स्वप्नांना खंबीरपणे जिवंत ठेवणं, आपल्या त्यागाने त्याच्या माणसांची मन सांधणं, मृत्यूनंतरही त्याची मान अभिमानाने ताठ राहील याचं समाजभान आपल्या प्रत्येक वागण्या-बोलण्यातून, आचरणातून पदोपदी समाजापुढे निरंतर मांडत राहणं, त्याच्या प्रत्येक तत्वाशी कोणतीही तडजोड न करता ती जिवंत ठेवण्याचा आपल्या परीने आयुष्यभर आटोकाट प्रयत्न करत राहणं, कोणत्याही परिस्थितीत कसलाही तोल न ढळू देता चारित्र्यवान भारतीय स्त्री चं आदर्श उदाहरण संपूर्ण जगाला दाखवून देणं हे सर्व करू शकणारी, भारतीय संस्कृतीचं सर्वोत्तम प्रतीक बनणारी अतुलनीय स्त्री म्हणजे सोनिया गांधी !

खरंतर भारतीय स्त्रीसंस्कृतीची सगळी उदात्त रूपं जगापुढं आपल्या मूर्तिमंत उदाहरणाने ठेवणाऱ्या सोनिया गांधींचा सन्मान राहिलाच पण राजकीय असूयेपोटी चारित्र्यहनन करताना भाजप आणि संघ परिवाराने गाठलेली नीच पातळी म्हणजे संस्कृतीरक्षणाचे ठेके चालविणाऱ्यांचा विकृत चेहेराच ! सोनिया गांधींवर बोलताना घसरलेली हीन पातळी ही इतकी खाली घसरली की ऐकणाऱ्यांना वाटावे की बोलणाऱ्याच्या घरी आया-बहिणी आहेत की नाहीत !

सोनिया गांधींचे राजकीय यश किती, त्यांच्या कारकिर्दीचा आलेख हे सगळे विषय त्यांनी जगापुढं उभा केलेल्या एका आदर्श आणि संस्कारक्षम भारतीय स्त्रीच्या सर्वोत्तम प्रतिमेपुढे झाकले जातात !

स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय-सामाजिक इतिहासात सोनिया गांधींइतके धीरोदात्त उदाहरण सापडणे विरळच ! सततचं चारित्र्यहनन, सततची शिवराळ टिपण्णी, गलिच्छ भाषेत उडत राहणारे शिंतोडे या सगळ्यांना न जुमानता अस्सल भारतीयत्वाचा संस्कार त्यांच्या प्रत्येक कृतीतून ओथंबून वाहत राहिला, इतका की जणू काही सामाजिक विखार आणि द्वेषाच्या शेणाचे शिंतोडे अंगावर घेत आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून उदात्त ध्येयासाठी चालत राहणारी आधुनिक सावित्रीच !

आज ज्यावेळी त्यांच्या वाढदिवसादिवशी समाजमाध्यमांमध्ये अत्यंत खालच्या पातळीचे माणुसकीला लाजवणारे ट्रेंड अजूनही पसरवले जातात त्यावेळी मात्र भारतीय संस्कारांचं प्रतिबिंब संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या वर्तणुकीतून दाखवणाऱ्या या कणखर स्त्रीला अभिवादन करू वाटते 

सोनियाजी गांधींना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !