Wednesday, December 9, 2020

सोनिया गांधी








सोनिया गांधी : भारतीय संस्कृतीचं सर्वोत्तम प्रतीक

कर्मसंयोगानं तिचं लग्न होतं, घरचे सगळे पाश सोडून ती आपल्या आयुष्यभराच्या जोडीदारासोबत त्याच्या घरी निघते, निस्सीम प्रेम या एकाच अपेक्षेसहीत ती संपूर्ण आयुष्य त्याचा गाव, त्याची माणसं, त्याची कर्तव्य, त्याचे ताण, त्याच्या आवडी-निवडी या सगळ्यांना अगदी सहजपणे आपलंस करून आयुष्यभर त्याला जीवापाड साथ देत पोटतिडकीने जपते ! ही वर्णनं म्हणजे भारतीय स्त्रिसंस्कृतीची ओघवती वैशिष्ट्येच !

पण हे सगळं करता करता एखाद्या स्त्रीच्या वाट्याला अनपेक्षित वैधव्याचं दुःख आलं तर? तिथून पुढचा आयुष्यभराचा काळ तिच्यासाठी अगणित संघर्ष आणि परीक्षांचाच असतो !

या परिस्थितही अनंतात विलीन झालेल्या आपल्या जोडीदाराच्या स्वप्नांना खंबीरपणे जिवंत ठेवणं, आपल्या त्यागाने त्याच्या माणसांची मन सांधणं, मृत्यूनंतरही त्याची मान अभिमानाने ताठ राहील याचं समाजभान आपल्या प्रत्येक वागण्या-बोलण्यातून, आचरणातून पदोपदी समाजापुढे निरंतर मांडत राहणं, त्याच्या प्रत्येक तत्वाशी कोणतीही तडजोड न करता ती जिवंत ठेवण्याचा आपल्या परीने आयुष्यभर आटोकाट प्रयत्न करत राहणं, कोणत्याही परिस्थितीत कसलाही तोल न ढळू देता चारित्र्यवान भारतीय स्त्री चं आदर्श उदाहरण संपूर्ण जगाला दाखवून देणं हे सर्व करू शकणारी, भारतीय संस्कृतीचं सर्वोत्तम प्रतीक बनणारी अतुलनीय स्त्री म्हणजे सोनिया गांधी !

खरंतर भारतीय स्त्रीसंस्कृतीची सगळी उदात्त रूपं जगापुढं आपल्या मूर्तिमंत उदाहरणाने ठेवणाऱ्या सोनिया गांधींचा सन्मान राहिलाच पण राजकीय असूयेपोटी चारित्र्यहनन करताना भाजप आणि संघ परिवाराने गाठलेली नीच पातळी म्हणजे संस्कृतीरक्षणाचे ठेके चालविणाऱ्यांचा विकृत चेहेराच ! सोनिया गांधींवर बोलताना घसरलेली हीन पातळी ही इतकी खाली घसरली की ऐकणाऱ्यांना वाटावे की बोलणाऱ्याच्या घरी आया-बहिणी आहेत की नाहीत !

सोनिया गांधींचे राजकीय यश किती, त्यांच्या कारकिर्दीचा आलेख हे सगळे विषय त्यांनी जगापुढं उभा केलेल्या एका आदर्श आणि संस्कारक्षम भारतीय स्त्रीच्या सर्वोत्तम प्रतिमेपुढे झाकले जातात !

स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय-सामाजिक इतिहासात सोनिया गांधींइतके धीरोदात्त उदाहरण सापडणे विरळच ! सततचं चारित्र्यहनन, सततची शिवराळ टिपण्णी, गलिच्छ भाषेत उडत राहणारे शिंतोडे या सगळ्यांना न जुमानता अस्सल भारतीयत्वाचा संस्कार त्यांच्या प्रत्येक कृतीतून ओथंबून वाहत राहिला, इतका की जणू काही सामाजिक विखार आणि द्वेषाच्या शेणाचे शिंतोडे अंगावर घेत आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून उदात्त ध्येयासाठी चालत राहणारी आधुनिक सावित्रीच !

आज ज्यावेळी त्यांच्या वाढदिवसादिवशी समाजमाध्यमांमध्ये अत्यंत खालच्या पातळीचे माणुसकीला लाजवणारे ट्रेंड अजूनही पसरवले जातात त्यावेळी मात्र भारतीय संस्कारांचं प्रतिबिंब संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या वर्तणुकीतून दाखवणाऱ्या या कणखर स्त्रीला अभिवादन करू वाटते 

सोनियाजी गांधींना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !

Saturday, November 28, 2020

महात्मा जोतिबा फुले आणि "शिक्षित भक्त"

सामाजिक क्रांती आपोआप घडत नसते, ती घडवावी लागते, 

आपोआप घडत असती तर स्त्रिया, बहुजन हजारो वर्षे गुलामीच्या क्रूर डोहात खितपत पडले नसते !

"विद्येविना..." च्या मंत्राने ज्या बहुजन समाजाला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अधिकाराचं भान आलं त्याच समाजातली उच्चशिक्षित पोरं आज तथाकथित बुद्धिभेदाला बळी पडुन विषारी धर्मांध गप्पा झोडतात, पराकोटीचा चिकित्साद्वेष दाखवतात त्यावेळी "विद्येच्या" मार्यादाही  स्पष्ट होतात 

द्वेषाचं विष उतरलं की मेंदू सडायला वेळ लागत नाही, सडक्या मेंदूचा आणि शिक्षणाचा काहीएक संबंध नाही याची आजकाल वारंवार प्रचिती येत राहते !

पण हे असं का? अनेक समाजसुधारकांच्या अपरिमित बलिदान आणि त्यागानं झालेल्या सामाजिक क्रांतीनंतरही विषवल्लीचं पीक का जोमानं वाढतंय यामागची कारणंही आपल्याच घरांमध्ये दडलीयेत !

आपला भाऊ, बहीण, मुलं, जवळचे नातेवाईक कोणत्या बैठकीत बसत आहेत, कोणाच्या संगतीत वावरताहेत, त्यांना काय दाखवलं जातंय यावर जर लक्ष नाही दिलं तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आणि पर्यायानं देशाला कोणीही वाचवू शकणार नाही आणि यावर उपाय म्हणजे त्यांच्याशी संवाद, चिकित्सा, वैचारिक आणि चांगल्या चर्चा आणि मुख्यत्वे करून वाचन अन्यथा महात्मा जोतिबा फुलेंनाही "विद्येविना.." चा संदेश अपूर्ण राहिल्याचा पश्चाताप होईल !

Friday, October 2, 2020

गांधीचोर



कॉम्रेड गोविंद पानसरेंचा त्यांच्या हत्येच्या काही दिवस आधी एका वर्तमानपत्रामध्ये एक लेख आला होता, त्यामध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं -  महात्मा गांधी झिंदाबाद, गांधीवाद मुर्दाबाद !!

आपल्या सर्वांना एका धोक्याचा इशारा देताना त्यांनी लिहिलं होतं आणि ते बोलायचेही की ज्यावेळी एखाद्याला मारून किंवा बदनामी करून त्याला किंवा त्याच्या विचारांना संपवता येत नाही त्यावेळी ही मंडळी वरवर त्याचीच पूजा करू लागतात आणि आतून बदनामीची आणि  आपल्या गलिच्छ विचारांची कुजबुज मोहीम चालूच ठेवतात !

एकीकडे बुद्धाचं आणि गांधींचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे मात्र "सातत्याने अपशब्द वापरणाऱ्या, घाणेरड्या लैंगिक टिपण्णी करणाऱ्या आणि समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यासाठी अफवा पसरवणाऱ्या जवळपास सर्वच समाजकंटकांना" ट्विटर सारख्या समाजमाध्यमांमध्ये फॉलो करायचं ही भारतासारख्या देशाच्या पंतप्रधानांची कृती कॉम्रेड पानसरेंनी सांगितलेल्या "त्याच" धोरणाची द्योतक आहे !

समाजापुढं जाताना अत्यंत नाटकी स्वरूपात गांधींचा जयघोष करायचा आणि मागून आपली "अंधारातली" कृष्णकृत्यं चालूच ठेवायची यातून काय साध्य होतं असेल बरं?

लोकशाही, मानवता, प्रेम, धर्मनिरपेक्षतेसारख्या मूल्यांवर श्रद्धा असणाऱ्या लोकांना गोंधळात टाकून, त्यांच्या टीकेची धार बोथट करून, आपल्या क्रूर आणि द्वेषपूर्ण मोहीमांतील अनेक अडथळे सहज दूर करण्याचं त्यांचं हे नवं तंत्र कॉम्रेड गोविंद पानसरेंनी आधीच ओळखलं होतं, कदाचित म्हणूनच त्यांच्या भीतीने पुन्हा "गांधी" मारायचा भेकड प्रयत्न केला असेल !

उत्तुंग गांधीविचारांची बेमालूमपणे होतं असलेली ही सहज विटंबना आपल्या लक्षात येईपर्यंत द्वेषमूलक तत्वांनी आपल्या मेंदूचा ताबा घेतलेला आपल्याला कळावा म्हणून हा लेखन प्रपंच

बाकी "मरते हम तुम है, गांधी कभी मरते नहीं" असं नुसतं बोलून आजच्या विषारी युगात चालणार नाही तर अखंड सावध राहून मानवतेच्या मारेकऱ्यांनी "चोरलेला" गांधी समजूनही घ्यावा लागेल आणि आपल्या खऱ्या गांधीला जपावंही लागेल, हृदयाच्या अगदी खोल कप्प्यात !

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏

Monday, August 31, 2020

आंधळी जखम

 आंधळी जखम


सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर सध्या आपले सगळे शासनकर्ते आणि प्रसारमाध्यमं इतकी व्यस्त झालीयेत कि त्यांच्या कर्कश्यपणाच्या किंकाळ्या ऐकल्या की उबग तर येतोच पण मनात खोल शंका दाटून येते की आता यांचं काय लपवायचं चालू आहे?

उध्वस्थ अर्थव्यवस्था, द्वेषानं भिनलेली विखारी मनं, देशातल्या चिरडून टाकल्या गेलेल्या संवैधानिक संस्था, विध्वंसाचा पाठ पढवून देशाच्या नैतिक आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमेच्या झालेल्या चिंधड्या, बेरोजगारीचा उच्चांकी दर, जीडीपी ची चिंताजनक घसरण, चीन चा प्रश्न, शेतमाल, दूधदर सारख्या आपल्या रास्त मागण्यांसाठी रोज रस्त्यांवर यावं लागणारा शेतकरी बळीराजा, लोकशाही सूचकांकातली भारताची घसरण, आणि करोना ने जात असलेले रोजचे जीव…. हे सगळं नाकातोंडाशी आलं असताना सुद्धा आपलं काय चाललंय तर आमदार खरेदी-विक्री, हिंदू-मुस्लिम, आणि बिहार निवडणुकीसाठी आता तर काय सुशांत सिंग !

बरं, या प्रकरणातही काय दाखवलं जातंय? “नरेंद्र मोदी” सिनेमाचा निर्माता संदीप सिंग याचं नाव या केस मध्ये ड्रुग्स पुरवण्यामध्ये वगैरे आलंय त्याच्याबद्दल कोठेही कसलीच चर्चा का नाही? कारण तो मोदी आणि भाजप शी संबंधित आहे म्हणून? आता तो देश सोडायच्याही तयारीत आहे त्याबद्दल कोण का बोलत नाही? मोदी, अमित शाह आणि भाजपशी संबंधित असल्यानेच हे प्रकरण सीबीआय ला दिलं गेलं का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न कोठे लुप्त होतात?

मुंबई मध्ये अन्वय नाईक यांनी आत्महत्या करताना अर्णब गोस्वामीचं चक्क नाव लिहून पत्र ठेवलेलं असतानाही त्यावर माध्यमांतून कसलीही चर्चा होत नाही आणि कसलाच धागा दोरा नसताना मात्र सुशांत सिंग वर २४ तास चर्चा झडतात हा विरोधाभास का? अर्णब गोस्वामी मोदींच्या बाजूने बातम्या आणि चर्चा करतो म्हणून कि त्याचा बिहार निवडणुकीत कोणताही फायदा नाही म्हणून?

सध्या बिहारी राजकारणी, शेखर सुमन सारखे अभिनेते बेंबीच्या देठापासून सुशांत सिंग वर बोलतायत. ८ लोकांचा बळी घेणाऱ्या, २५ लाखांच्या वर लोकांना विस्थापित करणाऱ्या आणि जवळपास ८० लाख लोकांना प्रभावित करणाऱ्या बिहारमधील महापुरावर कोण बोलणार? त्यावर कोण प्रतिक्रिया देणार? सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यावर सरळ सरळ परिणाम करणाऱ्या या सगळ्या मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांसहित सगळ्या बिहारी अभिनेते आणि सत्ताधाऱ्यांची दातखीळ का बसलीये? बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंगचे धिंडवडे काढून जनतेची दिशाभूल करायची निर्लज्ज मोहीम आपलं नैतिक अधःपतन ठळकपणे दर्शवते !

ज्यावेळी आपण प्रसारमाध्यमांवर चहाचे घोट घशाखाली ढकलत अगदी चवीनं आपल्याला व्यस्त ठेवायची व्यवस्था करायला पेरल्या गेलेल्या या बातम्या २४ तास  बघत असतो त्यावेळी काहीतरी अघटित घडवायचे विषारी मनसुबे कोठेतरी आकार घेत असतात.

करोना चा कहर चालू होत असताना राकेश सिन्हा नावाच्या एका अर्वाच्य विचारसरणीच्या राज्यसभा सदस्याने सभागृहात संविधानाच्या उद्देशिकेतून चक्क "समाजवाद" हा शब्दच काढून टाकायची तयारी चालवली होती. ?

आज आपण हिंदू-मुस्लिम आणि सुशांत सिंग मध्ये अडकलो असताना केंद्राच्या कॅबिनेट ने संसदेत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता शेतीविषयक तीन अत्यंत महत्वाचे अध्यादेश आणले. या अध्यादेशांनुसार मार्केट कमिटीच्या बाहेरील कॉर्पोरेट कंपन्यांना टॅक्स फ्री केले आहे ज्यामुळे ही लोकं शेतकऱ्यांकडून शेतमाल घेऊन आपल्या गोदामांमध्ये भरून ठेऊ शकतात आणि वेळ आल्यावर मनमानी पद्धतीनं तो विकूही शकतात, राज्यांचा असणारा अंकुशही संपुष्टात येण्याची चिंन्हे यामुळे दिसत आहेत, कॉन्ट्रॅक्ट शेतीला बळ मिळण्याची शक्यता दाट झाली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांच्या पैशातून उभा केल्या गेलेल्या आणि शेतकऱ्यांनी मिळून चालवल्या जात असलेल्या देशभरातल्या मार्केट कमिट्यांचं अस्तित्वही संपुष्टात येण्याची शक्यता गडद झाली आहे.

पंजाब, राजस्थान, हरियाणा सहित अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी याविरोधात सोशल डिस्टंसिंग पाळत जोरदार आंदोलने केली पण एन.डी.टी.व्ही. सारखा एखादा अपवाद वगळता राज्यकर्त्यांनी बहिरा बनविलेली संपूर्ण देशातील प्रसिद्धीमाध्यमे मात्र इतकी व्यस्त होती की लोकांच्याच जीवनाशी सरळ सरळ निगडित असणारे इतके महत्वाचे शासन निर्णय त्यांना लोकांनाच सांगू वाटले नाहीत !

विशेष म्हणजे शेतीमध्ये ऐतिहासिक क्रांतीच्या नावाखाली आणल्या गेलेल्या या अध्यादेशामध्ये शेतमालाच्या हमीभावावर मात्र अवाक्षरही  काढलेलं नाही ! तरीही शासनाचा हा निर्णय किती बरोबर आणि किती चूक यावर मतमतांतरं असू शकतात, पण देशातल्या ७० टक्के लोकांना प्रभावित करणाऱ्या, त्यांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या या निर्णयाची चर्चा शासनानेही करू नये आणि त्यापेक्षा वाईट म्हणजे प्रसारमाध्यमांनीही यावर काहीही न बोलता सुशांत सिंग किंवा अन्य गोष्टींवर मनोरंजनपर वाद-विवाद देशाला रोजच्या रोज दाखवत राहावेत या इतकी जनतेची क्रूर थट्टा असूच शकत नाही.

बरं हे त्यांच्याकडून काही पहिल्यांदाच झालंय असंही नाही !

मार्च २०१८ ला जवळपास तीस ते चाळीस हजार शेतकरी आपल्या मागण्यांसाठी नाशिक पासून मुंबई पर्यंत दोनशे किलोमीटर अंतर रक्तबंबाळ पायांनी चालत येतात पण अपवाद वगळता संपूर्ण देशातला मीडिया मात्र श्रीदेवीच्या बातम्यांमधून बाहेरच यायला तयार नव्हता ! कदाचित त्यांना शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या शेतीचं जीवघेणं दुखणं देशापुढं येऊच द्यायचं नसेल किंवा त्यांना पोसणाऱ्या तत्कालीन शासनकर्त्यांचा तसा आदेशही असेल (योगायोगानं आत्ताही तेच आहेत) !

ग्रामीण मराठीमध्ये एक शब्दप्रयोग आहे "आंधळी जखम"

शरीराच्या एखाद्या जागी जागी सतत जखमा होत राहिल्या की माणसाला त्या जखमेची जाणीवच व्हायची बंद होते. सध्याच्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या आणि देशातील संपूर्ण जनतेच्या बाबतीत नेमकं हेच केलंय. त्यांचं दुखणं, त्यांच्या रोजच्या समस्यारूपी जीवघेण्या जखमा बघायला यांना वेळ तर नाहीच पण कधी श्रीदेवी तर कधी गांजा ओढणाऱ्या सुशांत सिंग ची कॅसेट लावून शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या मूलभूत समस्यांना लपविण्याची क्रूर व्यवस्था बेमालूमपणे करायला यांना लाजही वाटत नाही !

देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या वेदनांचं अस्तित्वच नाकारणारे क्रूर शासनकर्ते आणि या कटात निर्लज्जपणे सामील होणाऱ्या प्रसारमाध्यमांतील नराधमांची मग्रुरी लोकांच्या भळभळत्या जखमांतून निघणाऱ्या आक्रोशातनं वाहून जाईल !

Friday, June 19, 2020

बळीराजासाठी झटणारा सच्चा लढवय्या कोणाच्या डोळ्यात सलतोय?


बळीराजासाठी झटणारा सच्चा लढवय्या कोणाच्या डोळ्यात सलतोय?

सध्या एका वेगवान प्रचारानं जोर धरलाय
प्रसारमाध्यमांमधील "काही"जण विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत निष्ठेने पार पडताना दिसत आहेत..!आधीच तयार केलेले रेडी-मेड मेसेजेस फिरताना बघितले की या सगळ्याची मनापासून कीव येऊ लागते.

२०१४ च्या लोकसभेच्या आधी राजू शेट्टींना भाजप गोटात नेण्यासाठी विरोधी पक्षातील सगळ्याच दिग्गज नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि  त्यांना साकडं घालून नरेंद्र मोदींची भेट घडवून आणली.
जवळपास एक तास चाललेल्या या भेटीत राजू शेट्टींनी शेती आणि शेतकरी धोरणांचे अनेक मुद्दे मोदींकडून कबुल करून घेऊन एन.डी.ए. च्या जाहीरनाम्यात घ्यायला लावले परंतु निवडून आल्यावर जसजसे दिवस जातील तसतसे केंद्र शासनाकडूनच शेतकरी धोरणांना हरताळ फासण्याचा एककलमी कार्यक्रम चालू झाला.
शेतीविषयक धोरणांतील उदासीनता, अर्थसंकल्पातील शेतीवरील घटत्या तरतुदी आणि घटते प्राधान्य, धार्मिक द्वेष पसरवून कोणत्याही परिस्थितीत सत्ता हस्तगत करण्यासाठी पातळी सोडून चाललेलं गलिच्छ राजकारण या सगळ्याला कंटाळून राजू शेट्टींनी शेवटी एन डी ए ला रामराम ठोकला..!

२०१७ ला सत्तेत असताना एन डी ए ला रामराम ठोकणारे राजू शेट्टी हे देशातले पहिले असे शेतकरी नेते होते ज्यांनी लयाला चाललेल्या शेतकरी चळवळी आणि आंदोलनं फक्त जिवंतच ठेवली नाहीत तर देशपातळीवर शेतकऱ्यांच्या संघटनांची एकत्र मोट बांधायचं अत्यंत महत्वपूर्ण काम केलं.

यानंतरच्या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवरच घाव घालणाऱ्या केंद्र शासनविरोधात करण्यासाठीच्या संघर्षास बळ मिळावं म्हणून त्यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठीच्या प्रक्रियेत भाग घेतला आणि त्यातूनच महाविकास आघाडीचा मित्र पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर या संघर्षात उडी घेतली.

खरंतर राजू शेट्टींसारखा सच्चा लढवय्या शेतकरी नेता जर सत्ताधारी पक्षाच्या गोटात आला तर त्यांच्या विचारस्पष्टतेमुळे सत्ताधार्यांनाच त्यांचा त्रास व्हायला हवा, पण इथं  होतंय उलटंच..!
सत्ताधारी सोडून,  भाजप आणि त्यांच्यापेक्षा "काही" प्रसारमाध्यमांमध्येच असा काही पोटशूळ उठलाय की जणू कोणीतरी त्यांच्या ताटातली भाकरीच हिसकावून घेतली असावी..!

पूर्वी शेतकरी नेते शरद जोशींनी भाजपाची राज्यसभेची ऑफर स्वीकारलेली त्यावेळी या निर्णयाला "शेतकरी हितासाठी" म्हणणारे आता मात्र ही चळवळ भारतभर जिवंत ठेवणाऱ्या एकमेव शेतकरी नेते राजू शेट्टींना पाण्यात का बघतात हेच खरं तर न उलगडणारं कोडं आहे..!

कदाचित महाराष्ट्रभर सर्वदूर शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या राजू शेट्टींना मूळ राजकीय प्रवाहात जाऊन व्यवस्थेचा भाग होणं त्यांना बघवतही नसेल..!

एका सर्वसामान्य शेतकरी पोरानं व्यवस्थेचा भाग होऊन मूळ राजकीय प्रवाहात जाऊन शेती आणि शेतकरी विरोधी शासनाच्या विरोधात त्यांच्या पारंपरिक विरोधकांशी मिळून संघर्ष करणं, शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडून त्याला मूर्त रूप द्यायचा प्रयत्न करणं कोणाच्या डोळ्यात खुपतंय?

अशावेळी बळीराजासाठी धडपडणाऱ्या राजू शेट्टींनी ही संधी कोणत्याही परिस्थितीत दवडू नये.
"काही" प्रसारमाध्यमांनी उभा केलेल्या फसव्या धुक्याला शेतकरी राजानं बळी न पडता हे ठरवायलाच हवं की शेतकरी चळवळीच्या हितासाठीच्या संघर्षाला आकार देण्यासाठी विधानपरिषदेवर "बळीराजाचा" आवाज राजू शेट्टींच्या माध्यमातून घुमायलाच हवा..!

*शेतकऱ्यांच्या स्वप्नांना जिवंत ठेवणारा, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव लाखो शेतकऱ्यांच्या मध्ये बसून ठरवणारा, शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंना आपल्या डोळ्यातील आग बनवून आंदोलनाचा अंगार पेटवणारा राजू शेट्टी नावाचा जिगरबाज नेता व्यवस्थेत जाऊन त्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी धडपडणार असेल तर त्याचं स्वागतच, त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच..!

Thursday, April 2, 2020

"राम राम" ते "जय श्री राम"


*"राम राम" ते "जय श्री राम" - एक प्रवास*


आज रामनवमी,
माझ्या घरच्या एका व्यक्तीचा रामनवमी च्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेज आला, सगळ्यात वर लिहिले होते "जय श्री राम"…!
माझं वय ३७, पण मला कळत असल्यापासून त्यांनी कधीच रामनवमीच्या शुभेच्छा दिलेल्या आठवत नव्हत्या, खूप आठवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या आठवत नव्हतं. त्यांच्या मेसेज ची सुरुवात "जय श्री राम" ने वाचल्यावर मात्र काहीतरी गफलत असल्याची जाणीव तीव्र झाली.
आपल्या भारतीय संस्कृतीत "राम नामाचे" महत्व हे निर्विवाद आहे. आपल्याकडच्या अनेक "हाय-हॅल्लो" मध्ये राम अगदी कम्फरटेबली बसलाय.
आम्ही लहानपानपासून गावाकडे "राम राम" म्हणून बोलायची सुरुवात करायला शिकलो. परगावच्या व्यक्तीला "राम राम पाव्हणं" म्हणायची आपली रीत म्हणजे तर प्रेमाची आणि आपुलकीची एक लकेरच..!
गावाकडे तर "राम राम" ही हाक अगदी सगळ्या जाती-धर्मातली लोकं प्रेमाने उच्चारतात.
मोठा झाल्यावर वेगवेगळ्या राज्यांतील मित्र झाले. त्यांच्याकडेही पुन्हा तीच आपुलकी "राम नामात" वसलेली. त्यांच्या बोली भाषेत रुळलेला "राम" म्हणजे "जय सिया राम", "जय राम जी की"..!
तर असा हा राम नामाचा अद्भुत महिमा भारतीयांच्या अगदी नसानसात भिनलाय .
पण गेल्या काही वर्षांमध्ये आमचा हा प्रिय "राम" कोणीतरी चोरून नेल्याची खंत मनात दाटू लागलीये. "जय श्री राम" नावाच्या "राजकीय" घोषणेने आमचा "राम" बदनाम होत चाललाय. त्याचं नाव घेऊन "जय श्री राम" म्हणत लोकांच्या हत्या करण्याचं षड्यंत्र राजरोस रचलं जातंय, त्याचं नाव "जय श्री राम" नावाच्या घोषणेत वापरून द्वेषाची पेरणी करून जातीय दंगली घडवण्याचे विषारी मनसुबे भारतात सर्रास यशस्वी होत चाललेत.

एका मित्राचा मेसेज आला, "तुमच्या" गांधींच्याही तोंडात “राम”च असायचा”.
मी उत्तर दिले "मित्रा, बरोबर आहे तुझं ,
          पण गांधींच्या रामाची कधी कोणाला भीती नाही रे वाटली ..!"
गांधींचा "राम" हाही तोच "राम" होता जो शेकडो वर्षांपासून आमच्या संस्कृतीत रुजलाय, ज्यानं संबध भारतीयांना एकत्र बांधलंय आपल्या प्रेमळ हाकेने, त्याच रामाचं "रामराज्य" अपेक्षित होतं गांधींनाही..!

पण ज्यावेळी आपली माणसे आपला "खरा राम" विसरून काही जणांनी बनवलेला "विध्वंसक" राम बोलायला लागतात त्यावेळी मात्र त्यांचा पद्धतशीररित्या केलेला बुद्धीभेद अगदी स्पष्ट जाणवू लागतो, इतका की भीती वाटू लागते आणि काळजी वाटू लागते आपल्या "त्या" रामाच्या विटंबनेची, माणसं मारायला आणि दंगली घडवायला "राम नाम" वापरून त्याच्या केल्या जाणाऱ्या क्रूर थट्टेची..!

तळमळीने सांगू वाटते, बाबांनो हा नाही आपला राम,
आपला राम तर वसलाय
"राम-राम", "जय सिया राम", "जय राम जी की" मध्ये..!

चला त्याची उजळणी करू, चला आपल्या प्रेमळ रामाला पुन्हा न्याय देऊ, चला आपल्या महान संस्कृतीला पुन्हा जिवंत करू , चला पुन्हा प्रवास करू आपल्या "खऱ्या रामाकडे"..!

"राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा"

🙏🙏🙏 राम-राम 🙏🙏🙏