*"राम राम" ते "जय श्री राम" - एक प्रवास*
आज रामनवमी,
माझ्या घरच्या एका व्यक्तीचा रामनवमी च्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेज आला, सगळ्यात वर लिहिले होते "जय श्री राम"…!
माझं वय ३७, पण मला कळत असल्यापासून त्यांनी कधीच रामनवमीच्या शुभेच्छा दिलेल्या आठवत नव्हत्या, खूप आठवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या आठवत नव्हतं. त्यांच्या मेसेज ची सुरुवात "जय श्री राम" ने वाचल्यावर मात्र काहीतरी गफलत असल्याची जाणीव तीव्र झाली.
आपल्या भारतीय संस्कृतीत "राम नामाचे" महत्व हे निर्विवाद आहे. आपल्याकडच्या अनेक "हाय-हॅल्लो" मध्ये राम अगदी कम्फरटेबली बसलाय.
आम्ही लहानपानपासून गावाकडे "राम राम" म्हणून बोलायची सुरुवात करायला शिकलो. परगावच्या व्यक्तीला "राम राम पाव्हणं" म्हणायची आपली रीत म्हणजे तर प्रेमाची आणि आपुलकीची एक लकेरच..!
गावाकडे तर "राम राम" ही हाक अगदी सगळ्या जाती-धर्मातली लोकं प्रेमाने उच्चारतात.
मोठा झाल्यावर वेगवेगळ्या राज्यांतील मित्र झाले. त्यांच्याकडेही पुन्हा तीच आपुलकी "राम नामात" वसलेली. त्यांच्या बोली भाषेत रुळलेला "राम" म्हणजे "जय सिया राम", "जय राम जी की"..!
तर असा हा राम नामाचा अद्भुत महिमा भारतीयांच्या अगदी नसानसात भिनलाय .
पण गेल्या काही वर्षांमध्ये आमचा हा प्रिय "राम" कोणीतरी चोरून नेल्याची खंत मनात दाटू लागलीये. "जय श्री राम" नावाच्या "राजकीय" घोषणेने आमचा "राम" बदनाम होत चाललाय. त्याचं नाव घेऊन "जय श्री राम" म्हणत लोकांच्या हत्या करण्याचं षड्यंत्र राजरोस रचलं जातंय, त्याचं नाव "जय श्री राम" नावाच्या घोषणेत वापरून द्वेषाची पेरणी करून जातीय दंगली घडवण्याचे विषारी मनसुबे भारतात सर्रास यशस्वी होत चाललेत.
एका मित्राचा मेसेज आला, "तुमच्या" गांधींच्याही तोंडात “राम”च असायचा”.
मी उत्तर दिले "मित्रा, बरोबर आहे तुझं ,
पण गांधींच्या रामाची कधी कोणाला भीती नाही रे वाटली ..!"
गांधींचा "राम" हाही तोच "राम" होता जो शेकडो वर्षांपासून आमच्या संस्कृतीत रुजलाय, ज्यानं संबध भारतीयांना एकत्र बांधलंय आपल्या प्रेमळ हाकेने, त्याच रामाचं "रामराज्य" अपेक्षित होतं गांधींनाही..!
पण ज्यावेळी आपली माणसे आपला "खरा राम" विसरून काही जणांनी बनवलेला "विध्वंसक" राम बोलायला लागतात त्यावेळी मात्र त्यांचा पद्धतशीररित्या केलेला बुद्धीभेद अगदी स्पष्ट जाणवू लागतो, इतका की भीती वाटू लागते आणि काळजी वाटू लागते आपल्या "त्या" रामाच्या विटंबनेची, माणसं मारायला आणि दंगली घडवायला "राम नाम" वापरून त्याच्या केल्या जाणाऱ्या क्रूर थट्टेची..!
तळमळीने सांगू वाटते, बाबांनो हा नाही आपला राम,
आपला राम तर वसलाय
"राम-राम", "जय सिया राम", "जय राम जी की" मध्ये..!
चला त्याची उजळणी करू, चला आपल्या प्रेमळ रामाला पुन्हा न्याय देऊ, चला आपल्या महान संस्कृतीला पुन्हा जिवंत करू , चला पुन्हा प्रवास करू आपल्या "खऱ्या रामाकडे"..!
"राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा"
🙏🙏🙏 राम-राम 🙏🙏🙏
उत्तम..!
ReplyDeleteअचुक.
ReplyDeleteराम-राम !💐
ReplyDelete